हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्यात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांनी आपापल्या पातळीवर आगामी निवडणुकांची तयारी करण्यास सुरुवात देखील केली आहे. मुख्य म्हणजे, एकाच पक्षातील दोन गट आमने-सामने लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच शरद पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. अजित पवार हे आमचेच नेते आहेत राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असे शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शरद पवार काय म्हणाले ?
बारामती येथे मीडियाशी संवाद साधताना, “अजित पवार हे आमचेच नेते आहेत. पक्षात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, म्हणजे पक्षात फूट पडली असं म्हणण्याचं कारण नाही” असं शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.माध्यमांशी बोलताना, खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवार हे आमचेच नेते आहे. ते फक्त सत्ताधारी पक्षात आणि आम्ही विरोधी पक्षात आहोत इतकाच फरक आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रवादीत खरंच फूट पडली आहे का? तसेच या फुटीचा नेमका अर्थ काय असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना, “अजितदादा नेते आहेत. यात वादच नाही. फूट म्हणजे काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही” असे स्पष्टीकरण शरद पवार यांच्याकडून देण्यात आले आहे.
अजित पवारांच्या सभेविषयी भाष्य
तर यावेळी त्यांनी, अजित पवार यांच्या बीडमध्ये होणाऱ्या सभेवर देखील शरद पवार यांनी भाष्य केले. “लोकशाहीत सभा घ्यायला अडचण नाही. त्याबद्दल चिंता नाही. लोक जाहीर सभा घेऊन भूमिका मांडत असतील तर त्याचा आनंद आहे. त्यामुळे जनतेला कळेल सत्य काय आहे. त्यामुळे कोणीही सभा घेऊन भूमिका मांडत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो” असं शरद पवार यांनी म्हणले आहे. यानंतर त्यांनी आगामी निवडणुकांसाठी सुरू असलेली तयारी याबाबत माहिती दिली. यामध्ये, “निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील” असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सर्वात अगोदर खासदार सुप्रिया सुळे यांनी, “अजित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार आहे. सध्या त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यासंदर्भात आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली असून आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत” असे म्हणले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनी देखील अजित पवार आमचेच नेते असल्याचे म्हटल्यामुळे राजकीय चर्चांना आणखीन उधान आले आहे.