हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलेला आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याचा विचार केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. “कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने टास्क फोर्सने जर तशा स्वरूपाच्या पुन्हा निर्बधांबाबत सूचना केल्यास राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाऊ शकतात,” असे पवारांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्त पुणे येथे आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे. दोन, तीन दिवस ती कायम राहील. अशात कोरोनाच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लोकांनी काळजी घ्यावी. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याबाबत चर्चा झाली. मास्क वापरण्यासाठी पुन्हा सांगायचे का यावरही चर्चा झाली.
आघाडी सरकार आल्यावर काही दिवसात कोरोनाचे संकट आले, आपण सर्वांनी शर्थीने या संकटावर मात केली. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी अजून ते संपलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध जरी हटवले असले तरी सर्वांनी स्वच्छेने मास्क वापरला पाहिजे. वाढत्या रुग्णसंख्येबाबत लक्ष ठेवले जात असून टास्क फोर्सचाही सल्ला घेतला जात आहे. तसेच तज्ज्ञांशीही चर्चा केली जात आहे. जर रुग्णसंख्येचे प्रमाण वाढू लागले आणि टास्क फोर्सने सूचना केल्या तर काही बंधने लागू केली जाऊ शकतात, असे पवार यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभेबाबत पवार म्हणाले….
राज्यात आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बुस्टर डोस सभा होत आहे. या सभांबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, “बुस्टर डोस सभा आणि राजसभा ही माध्यमांनीच नावे पाडली आहेत. प्रत्यक्षात असे काही नसते. प्रत्येकाला आपले विचार मांडायचा अधिकार आहे. सभाना परवानगी देत असताना त्या त्या भागातील संबधित अधिकारी देत असतात. तसेच औरंगाबाद येथील सभेला परवानगी देताना काही अटी घालून दिल्या आहेत, असे पवार यांनी यावेळी म्हंटले.