पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर राष्ट्रवादीचा दावा? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

ajit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेसाठी कधीही पोटनिवडणूक लागू शकते. त्यामुळे या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या एका विधानाने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत बोलताना ज्याची त्याठिकाणी ताकद जास्त आहे त्या पक्षाचा उमेदवार असेल असं अजित पवारांनी म्हंटल आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभेच्या निवडणूकीला एकच वर्ष राहीलं आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही असे मला वाटलं होते. पण पुण्यात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे. निवडणूक लागेल तिथे मित्र पक्षांच्यामध्ये ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद पाहणे म्हणजे वजन करायचे का? तर नाही… मागील निवडणुकीत ज्यांना जास्त मते त्यांची ताकद जास्त असे समजता येईल असं अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी काही उदाहरणे सुद्धा दिली.

आज पुण्यात राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. महानगरपालिकेत आम्ही आमची ताकद दाखवली आहे. आमचे ४० नगरसेवक होते. आमच्या मित्र पक्षाचे १० नगरसेवक होते. शहरात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. रवींद्र धंगेकर यांनाही तुम्ही खासगीमध्ये विचारा. त्यांना निवडून आणण्याकरिता ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीच्या सर्व पक्षांनी सहकार्य केले. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे कि जी काय निवडणूक लागेल त्यामध्ये आमच्या मित्रपक्षांपैकी ज्याची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. यामध्ये मागील स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती घ्यायची, मागील निवडणुकीत कोणाला किती मते पडली ही माहिती घ्यायची आणि अंदाज घ्यायचा असं अजित पवारांनी म्हंटल.