काही लोक नुकसानीची पाहणी करायला येतात कि अधिकाऱ्यांना बघायला; अजित पवारांचा राणेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या अतोनात झालेल्या नुकसानीची नुकतीच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांना आपल्या दौऱ्यावेळी गैरहजर राहिल्याबाबत चांगलेच झापले होते. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंना टोला लगावला आहे. “काही नेतेमंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे, प्रांत कुठे आहे, याची विचारणा करत बसलो नाही. मात्र, काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे,” असे म्हणत पवार यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

भाजपनेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा कोकण दौरा व त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांवर केलेली आगपाखड यावरून आता भाजपवर महाविकास आघाडी सरकारमधून टोलेबाजी केली जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना नाव न घेता टोला लगावला. नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना केलेल्या दमबाजीवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र, अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून दौरा करीत असून त्यांना याची माहितीही देणार असल्याचे सांगितले होते. त्यात मंत्री राणेंच्या दौऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकारीही गैरहजर राहिल्याने मंत्री राणे चांगलेच संतापले होते.

Leave a Comment