मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार आजोबांच्या भेटीला पोहोचले होते. शरद पवारांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार ‘सिल्व्हर ओक’वर गुरुवारी रात्री दाखल झाले. सुप्रिया सुळेही यावेळी उपस्थित होत्या. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याच जवळपास दोन तास चर्चा सुरु होती. असं वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’ने दिलं आहे. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारलं होतं. शरद पवार यांना पार्थ पवार यांनी सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी पार्थ पवार अपरिपक्व असून, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही अशा शब्दांत फटकारलं होतं. शरद पवारांनी अशा पद्धतीने फटकारल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची आहे.
अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी भाजपाकडून करण्यात येत असताना महाविकास आघाडी सरकारकडून मुंबई पोलीस हा तपास योग्यपणे करीत असल्याची ग्वाही दिली जात आहे. त्याच वेळी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांतसिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र दिले होते. या पत्राची प्रत आणि गृहमंत्र्यांना निवेदन देतानाचे छायाचित्र त्यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले होते. दरम्यान पार्थ पवार यांनी अद्याप या सर्व घडामोडींवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसून ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”