पुणे प्रतिनिधी | बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा सतीश काकडे यांनी सत्कार केला आहे. त्यांनी पडळकरांचा सत्कार केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. सतीश काकडे यांनी अजित पवारांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही केली आहे.
काकडे आणि पवार कुटुंबात जुना राजकीय संघर्ष आहे. १९६७ सालापासून हा संघर्ष अविरत सुरु होता. तो संघर्ष अजित पवार यांनी मिटवून आपल्या उमेदवारी अर्जावर सतीश काकडे यांची सूचक म्हणून स्वाक्षरी उमटवली होती. अजित पवार शुक्रवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करून गेले. त्यानंतर दुपारी गोपीचंद पडळकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले तेव्हा सतीश काकडे यांनी त्यांचा सत्कार केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
दरम्यान सतीश काकडे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. गोपीचंद पडळकर माझ्या संस्थेत आले होते. भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून मी त्यांचा सत्कार केला. पडळकर माझ्या सासरवाडीचे असले तरी मी त्यांचे समर्थन करणार नाही. यावेळीच्या निवडणुकीला आम्ही अजित पवारांच्या सोबत आहे असे सतीश काकडे म्हणाले आहेत.