हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला धारेवर धरत सीमावादाचा ठराव का आणला जात नाही? असा थेट सवाल केला आहे. बोम्मई जाणीवपूर्वक सीमावाद पेटवत असताना राज्य सरकारने ठोस प्रत्युत्तर द्यावे अशी महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे असेही ते म्हणाले.
राज्याचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु झाला असून यावेळी सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे तेथील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. हे सगळं होत असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विधिमंडळात ठराव पास करून घेतला आहे. आपणही आपल्या सभागृहात एकमताने तसा ठराव आणू असं ठरलं होत मात्र अजूनही हा ठराव आणला गेला नाही अशी खंत अजित पवारांनी बोलून दाखवली. कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक सीमावादावर वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यांनी त्यांच्या सभागृहात ठराव संमत करत असताना आपल्या महाराष्ट्राला डिवचण्याचा काम केलं आहे . मात्र आपलं सरकार मात्र गप्प बसतंय. आपणही जशास तस उत्तर द्यावे अशी महाराष्ट्राची मागणी असल्याचं अजित पवारांनी म्हंटल.
अजित पवारांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. सीमावादाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्या आपण सीमावादावर प्रस्ताव आणणार आहे अशी माहिती दिली. या विषयावर सभागृह एक आहे असेही ते म्हणाले.