…म्हणून टाकला चहापानावर बहिष्कार; अजितदादांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं नेमकं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून महापुरुषांबद्दल वारंवार बेताल वक्तव्य केली जात आहेत. त्यावर माफीही मागायलाही ते तयार नाहीत. सीमाप्रश्नावर देखील शिंदे फडणवीस सरकारची भूमिका ठोस नाही. जो प्रश्न चर्चेतून सुटायला हवा मात्र, तिथं तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. राज्यातील गावं दुसऱ्या राज्यात जाण्याबद्दल ठराव करत आहेत. त्यावरही सरकारने भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नागपूरमध्ये उद्यापासून हिवाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी बैठक घेतली. यावेळी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी अजित पवार म्हणाले की, कर्नाटक सीमाप्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित आहे. पण सध्याचं सरकार आल्यावर तो सुटण्याऐवजी तो अधिक चिघळला. उलट महाराष्ट्रातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा करू लागले.अशी हिंमत याआधी कुणाची झाली नव्हती पण आता हे सगळं घडत आहे. आमचा विकास होणार नसेल तर आम्ही इतर राज्यात जाऊ अशी भूमिका काही गावं घेऊ लागली, हे शिंदे फडणवीस सरकारचं अपयश आहे.

आज राज्यात ग्रामपंचायतचे मतदान असल्याने अनेक आमदार आज सहभागी झाले नाहीत. उद्या आमदार सहभागी होतील. शिंदे-फडणवीस सरकार येऊन सहा महिने झाले आहेत. मात्र, या सरकारकडून अपेक्षित काम झालेले नाही. एकीकडे सरकार काहीच काम करत नसताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली जात आहेत. त्यावर माफीही मागायला ते नेते तयार नाहीत.

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महापुरूषांचा अवमान केला जातोय. हे वारंवार घडतंय. ही वक्तव्य महाराष्ट्र खपवून घेणार नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेलं विधानआक्षेपार्ह आहे. त्याचं समर्थन कुणीही करू शकत नाही. त्यांच्यानंतर भाजपचे नेतेही अशीच वक्तव्य करत आहेत. याचा आम्ही विरोधक म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध करत आहोत, असे अजित पवार यांनी म्हंटले.