हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या ३० पेक्षा अधिक समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच त्यांच्या सोबतच्या ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळेल याकडे नेत्यांच्या समर्थकांचे लक्ष्य लागलं आहे. त्यापूर्वीच याबाबतची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यानुसार सरकारच्या तिजोरीची चावी ही अजित पवार यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे.
पहा खातेवाटपाची संभाव्य यादी –
अजित पवार- अर्थ किंवा महसूल खातं
दिलीप वळसे -पाटील – सांस्कृतिक व कृषी खातं
धनंजय मुंडे- सामाजिक न्याय खातं
हसन मुश्रीफ- अल्पसंख्यांक आणि कामगार
आदित तटकरे- महिला व बाल कल्याण
धर्मराव आत्राम- आदिवासी विकास खातं
संजय बनसोडे- क्रीडा व युवक कल्याण
अनिल पाटील – अन्न व नागरी पुरवठा
दरम्यान अजित पवार यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या गेल्यास शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते असा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र आता अजित पवारांना अर्थ किंवा महसूल खातं मिळणार असल्याने शिंदे गटामध्ये नाराजीचा सूर आहे. याशिवाय भाजपने अजित पवार यांच्यासह ९ नेत्यांना मंत्रीपदे दिल्याने शिंदे गटातील नेत्यांना आता मंत्रिपदाची संधी आहे का? असाही प्रश्न निर्माण झालाय.