बीड प्रतिनिधी | शेख अनवर
अच्छे दिनचे स्वप्न दाखवणार्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाल्यामुळे बीडमध्ये स्पीड पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली तर साधे पेट्रोल 98 रुपयांपर्यंत गेले आहे. आज पेट्रोल, डिझेल दरवाढीचा ‘दहावा’ सर्वसामान्यांनी घातला.
2014 च्या निवडणुकीनंतर ‘पेट्रोल-डिझेल के भाव कम हुए की नही’ असा सवाल विचारत उपस्थितांकडून होकार मिळवत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली पाठ थोपटून घेत होते. मात्र त्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलने अधिभार लावण्याचा सपाटा ठेवला. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून गेल्या दहा दिवसांपासनू पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असल्याने देशातल्या अनेक भागात पेट्रोलने शंभरी पार केली आहे.
आज दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल 25 ते 30 पैशाने वाढल्यामुळे बीडमध्ये पेट्रोलचे दर 100 पार करून गेले आहे. स्पीड पेट्रोल बीड शहरात शंभर रुपये 66 पैसे प्रतिलिटर झाले असून साधे पेट्रोल 97.60 पैशे झाले आहे तर डिझेल 87.23 पैसे प्रतिलिटर झाले आहे. रोज वाढणार्या पेट्रोलच्या दरामुळे सर्वसामान्यांचे महागाईमुळे कंबरडे मोडले जात असून सर्वसामान्यात संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळेच आज भाव वाढीनंतर पेट्रोल पंपावर सर्वसामान्यांना संतप्त प्रतिक्रिया देत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा दहावा म्हणत संताप व्यक्त केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.