भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद जगभर उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटना अल- कायदाने मुंबई, गुजरात, दिल्ली या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. संघटनेनं जारी केलेल्या पत्रकामध्ये ‘भगवे दहशतवादी’ असा उल्लेख करत मुंबई, दिल्लीत तुमच्या अंतासाठी तयार राहा असा इशारा दिला आहे.
अल कायदाने म्हंटल की, काही दिवसांपूर्वी एका हिंदुत्व प्रचारकाने टीबीच्या चर्चेदरम्यान इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ. पैगंबर मुहम्मदचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू.
आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. आम्ही आमच्या शरीराला आणि आमच्या मुलांच्या शरीराला स्फोटके जोडू जेणेकरून अशा लोकांना उडवता येईल. पैगंबर मुहम्मद यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही. दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमधील भगव्या कार्यकर्त्यांना संपवणार. तो त्याच्या घरात लपू शकणार नाही किंवा सुरक्षा दलही त्याला वाचवू शकणार नाही.
मुस्लिम देशांची जोरदार टीका-
प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक मुस्लिम देशांनी जोरदार टीका केली आहे. भाजपने रविवारी नुपूर शर्मा यांना निलंबित केले आणि दिल्लीचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केली. मुस्लिम संघटनांचा निषेध आणि कुवेत, कतार आणि इराण सारख्या देशांकडून तीव्र प्रतिक्रिया असताना, भाजपने एक निवेदन जारी केले होते की ते सर्व धर्मांचा आदर करते आणि कोणत्याही धर्माच्या आदरणीय लोकांच्या अपमानाचा तीव्र निषेध करतो.