पुणे : हॅलो महाराष्ट्र – माजी मंत्री आणि कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब शिवरकर यांच्याबरोबर त्यांची पत्नी व मुलावरदेखील वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब शिवरकर यांची सून म्हणजेच चिरंजीव अभिजीत शिवरकर यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्यांवर कलम 323/504/506/34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब शिवरकर यांची सून स्नेहा शिवरकर यांनी आपल्या तक्रारीत पतीच्या अनैतिक संबंधांचा जाब विचारल्यामुळे शिवरकर कुटुंबीयांनी आपला शारिरीक व मानसिक छळ केल्याचे म्हंटले आहे. तसेच अभिजीतने स्नेहा यांना मारहाण आणि शिवीगाळ करत हाकलुन देण्याची धमकी देखील दिली होती. सुनेने केलेल्या तक्रारीनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब शिवरकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
स्नेहा शिवरकर या पेशाने डॉक्टर असून त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. अभिजित शिवरकर आणि स्नेहा शिवरकर यांचे २००९ मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून त्यांना शिवीगाळ व मारहाण सुरू असल्याचा दावा स्नेहा यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. तसेच त्यांना मधुमेह असल्यामुळे तिला बोलणे ऐकावे लागत असल्याचे स्नेहा यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.