पाटण | पाटणहून कराडला रुग्ण घेऊन निघालेल्या 108 या रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने दुभाजकला धडकली. त्यानंतर गाडी पलटी झाली. सुदैवाने या अपघातातून सहाजण सुखरूप बचावले. निसरे फाटा येथे हा अपघात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला.
याबाबत माहिती अशी की, पाटण येथील ग्रामीण रुग्णालयामधून पिंपळोशी येथील अपघात झालेल्या रुग्णास घेऊन रुग्णवाहिका (MH-14-CL-0407) कराड येथील कृष्णा हॉस्पिटलकडे निघाली होती. दरम्यान, निसरे फाटा येथे भरधाव रुग्णवाहिकेचा मागील टायर फुटला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यात मागील बाजूचा टायरचा भाग तुटल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन रस्त्याच्या मधोमध घसरत गेली. रुग्णवाहिकेत रुग्णाबरोबर आलेले नातेवाईक डॉक्टर व चालक असे सहाजण होते.
अचानक मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. तसेच रुग्णवाहिकेतील सहा जणांना बाहेर काढले. यामध्ये काहींना किरकोळ इजा झाली. यानंतर उब्रज येथील दुसऱ्या रुग्णवाहिकेस बोलवण्यात आले. यावेळी मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी घटनास्थळी भेट दिली.