विशेष प्रतिनिधी । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या तीन दिवसांपासून रूग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यकृताच्या त्रासामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. आपलं यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी सांगितलं होतं. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार , अमिताभ बच्चन यांना जास्त त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवारी रात्री २ वाजता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना रूग्णालयात दाखल करून ३ दिवस झाले असल्याचं म्हटलं जात आहे. वृत्तानुसार प्रसिद्ध गेस्ट्रोन्ट्रोलॉजिस्ट डॉ. बारवे त्यांच्यावर उपचार करत आहेत. १९८२ साली ‘कुली’ चित्रपटा दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या यकृताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत आहे. त्यांना जेव्हा दुखापत झाली होती त्यावेळी ‘हेपेटाइटिस बी’ने ग्रस्त असलेल्या रूग्णाचं रक्त त्यांना चढवण्यात आलं होतं, असं म्हटलं जातं.
दरम्यान अमिताभ भच्चन यांना रूग्णालयातील एका विशेष खोलीमध्ये ठेवण्यात आलं आहे. परंतु अद्याप कोणतीही बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या भेटीसाठी रूग्णालयात पोहोचली नाही. ११ ऑक्टोबर रोजी ‘बिग बीं’नी ७७ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तसंच गेल्या महिन्यात त्यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. सात हिंदुस्तानी या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली होती.