हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वयंघोषित खलिस्तानी नेता आणि वारिस पंजाब डेचा प्रमुख असलेला अमृतपाल सिंग स्वतः आत्मसमर्पन करून पोलिसांना शरण जाईल, अशा चर्चा सुरू असतानाच आज त्याने एक व्हिडिओ जारी केला आहे. अमृतपालचा हा 40 मिनिटांचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय की,” आपली अटक ही देवाच्या हातात आहे. कोणीही आपल्या केसालाही धक्का लावू शकत नाही.” विशेष म्हणजे 18 मार्च रोजी फरार झाल्यापासून हा फुटीरतावादी नेता पहिल्यांदाच असा सार्वजनिकरीत्या दिसून आला आहे.
हा कट्टरपंथी फुटीरतावादी नेता अजूनही पोलिसांनाही गुंगारा देत आहे. मात्र आता त्याने भटिंडा येथील अकाल तख्तासमोर आत्मसमर्पण केल्याच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे, अकाल तख्तचे जथदार हे उघडपणे या फुटीरतावादी नेत्याच्या समर्थनार्थ उतरले आहेत. त्याचप्रमाणे यावेळी त्यांच्याकडून भगवान मान सरकारला 24 तासांत त्यांच्या सर्व सहाय्यकांची सुटका करण्यासाठी अल्टिमेटमही देण्यात आला आहे.
Amritpal Singh ਅਮ੍ਰਿਤਪਾਲ ਸਿੰਘ….#AmritpalSingh #Amritpal_Singh #Punjabi #Punjab #PunjabBachao pic.twitter.com/gmVertewxh
— Ravinder S Badhan (@RavinderSBadha1) March 29, 2023
या व्हिडिओमध्ये अमृतपालने शीख तरुणांना अटक केल्याबद्दल पंजाब पोलिसांवर टीका केली आहे. मला अटक करण्याचा पंजाब सरकारचा हेतू असता तर पोलिस माझ्या घरी आले असते आणि मी होकार दिला असता असेही त्यांनी म्हटले आहे.
व्हिडिओमध्ये अमृतपाल काळी फेटा आणि शाल घातलेला दिसत आहे. आम्हाला अटक करण्यासाठी पाठवलेल्या ‘लाखो पोलिसां’च्या प्रयत्नातून देवाने आम्हाला वाचवले, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे पंजाब पोलिसांनी 18 मार्च पासून अमृतपाल सिंग आणि त्यांच्या ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेच्या सदस्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. तेव्हापासून तो फरारी आहे.
त्यानंतर पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात त्याच्या ताफ्याला रोखण्यात आले होते, मात्र त्यावेळी तो पोलिसांच्या जाळ्यातून पळून जाण्यात यशस्वी झाला. गेल्या 12 दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाने आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असली तरी हा कट्टरपंथी धर्मोपदेशक अजूनही पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही.