हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील 413 उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दीड ते दोन वर्षांचा कालावधी झाला तरी अद्यापही नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान, आज राज्य सरकारच्या वतीने मोठा निर्यण घेण्यात आला. 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील 413 उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात यासाठी राज्य सरकारला पत्र देण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, या 413 पदांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. अनेकवेळा आंदोलन करण्यात आल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर एमपीएससी परीक्षेतील 2019 मधील उत्तीर्ण विध्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले. गट अ आणि गट ब पदांच्या नियुक्तीचे आदेश आज राज्य सरकारच्यावतीने काढण्यात आले.
राज्यसेवा परीक्षेतून 2019 साली गट अ आणि गट ब पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये अंतिम 413 विद्यार्थी पात्र ठरवण्यात आले होते. पण सुरुवातीला कोरोना आणि नंतर मराठा आरक्षणामुळे या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाली नाही. मराठा आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर या यादीमध्ये बदल करण्यात आला आणि पुन्हा निकाल लावण्यात आला. त्यावेळी या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्त्या देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते.