कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आनंदराव पाटील (नाना) यांची उद्या ७ जून रोजी विधानपरिषदेची मुदत संपत आहे. आमदारकीची मुदत संपल्यानंतर नाना काय भूमिका घेणार याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पाटील यांनी पृथ्वीराजबाबांची साथ सोडून भाजपाचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्याशी जवळीक वाढवली होती. तसेच आपले पुतणे आणि बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील व चिरंजीव मानसिंग व प्रताप पाटील यांना निवडणुकीआधी भाजपचा मफलर गळ्यात घालून नानांनी आपली वाट काय असणार याचे संकेत दिले. मात्र स्वतः नानांनी अद्याप काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली नाही. त्यामुळे नाना विधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचे लाक्ष लागले आहे.
याबाबत हॅलो महाराष्ट्राने आनंदराव पाटील यांच्याशी संवाद साधला असता लॉकडाउन उठलं कि मी पत्रकार परिषद घेऊन माझ्या आजवरच्या कामाबाबत सविस्तर माहिती देणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. तसेच शेवटी पक्षश्रेष्ठी जी भूमिका घेतील ते मान्य करावंच लागते. पण उमेदवारी दिली तर कोणाला नकोय? असंही पाटील यावेळी म्हणाले. उमेदवारी भाजपकडून कि काँग्रेस कडून असा प्रश्न विचारला असता ते आपण अद्याप गुलदस्त्यात ठेवले असून जेव्हा पत्रकार परिषद घेईल तेव्हा याबाबत खुलासा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
आमदार आनंदराव पाटील हे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री माजी खासदार व कॉग्रेसच्या प्रदेशाध्याक्षा प्रेमलाताई चव्हाम यांच्यापासून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत होते. तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर आ. पाटील यांची प्रति मुख्यमंत्री म्हणून छबी तयार झाली होती. त्यामुळेच २०१५ साली राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून आनंदराव पाटील यांची वर्णी लागली होती. पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रात मंत्री असताना कराडच्या होमपीचवर कार्यकर्ते सांभाळण्याचे काम आ. पाटील यांनी केले होते. दिल्लीत बाबा असताना गल्लीत नानांनी कॉग्रेस पक्षाची शिबिरे, कार्यक्रम राबविले. परंतु सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आ. पाटील व आ. चव्हाण यांच्यात दरी पडली. आ. पाटील यांच्या मुलाने भाजपात जाहीर प्रवेश करून आ. चव्हाण यांच्या विरोधात प्रचार केला. तर आ. पाटील यांनीही भाजपाचे अतुल भोसले यांचे काम केले. त्यामुळे कॉग्रेस विरोधी काम केल्याचा ठपका आ. चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी आ. पाटील यांच्यावर ठेवला होता. आता येत्या सात जूनला विधानपरिषद आमदारकीचा आनंदराव पाटील यांचा कार्यकाळ संपत आहे. तेव्हा आता ते कोणती भूमिका घेणार याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.