हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वहिदा रहमान आज आपला 84 वा वाढदिवस साजरा करत आहेत, 50-60 च्या दशकातील या दिग्गज अभिनेत्रीचे सौंदर्य आणि ग्रेस आजही कायम आहे. 3 फेब्रुवारी 1938 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या वहिदा यांना अभिनेत्री बनण्याची इच्छा नव्हती. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याची त्यांची इच्छा होती, मात्र देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीसाठीच बनवले होते असेच काहीसे वाटते.
भरतनाट्यम नृत्यात पारंगत असलेल्या वहिदा या अशा अभिनेत्री आहेत ज्या सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये सहजपणे बसत असत. 1972 मध्ये पद्मश्री, 2011 मध्ये पद्मभूषण, तीनदा फिल्मफेअर पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या या होतकरू अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित काही मनोरंजक किस्से त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेउयात.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची आठवण करून देणाऱ्या वहिदा रहमान यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांचे ‘प्यासा’ आणि ‘गाइड’ हे चित्रपट नेहमीच आठवणीत राहतात. अभिनयाची जबरदस्त प्रतिभा लाभलेल्या वहिदा यांच्या आयुष्यात ‘प्यासा’ चित्रपट खास असाच आहे. याच चित्रपटातून वहिदा आणि गुरु दत्त यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. त्यांची जोडी त्या काळात जबरदस्त हिट ठरली होती. ‘कागज के फूल’ आणि ‘चौधवी का चांद’, ‘साहिब बीबी और गुलाम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री देखील पाहायला मिळते. मात्र, कालांतरा नंतर दोघे वेगळे झाले आणि ज्यानंतर गुरु दत्त यांनी आत्महत्या केली.
वहिदा रहमानच्या फिल्मी करिअरच्या यशात ‘गाइड’ चा मोठा वाटा आहे. वहिदा आणि देव आनंद यांच्या जोडीने रुपेरी पडद्यावर कमाल केली. या चित्रपटासाठी वहिदा यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत वहिदा म्हणाल्या होत्या की,”जेव्हा मी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर पोहोचायचे तेव्हा देव आनंद यांना गुड मॉर्निंग मिस्टर आनंद म्हणायचे. त्यावर ते माझ्याकडे न बघता आजूबाजूला पाहत म्हणायाचे की, तू गुड मॉर्निंग कोणाला म्हणत आहेस?”. यावर ते म्हणाले की, “मी कोणी मिस्टर आनंद नाही, मला फक्त देव म्हण.”
यांनतर वहिदा रहमान यांनी त्यांना सांगितले की, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे आहात, त्यामुळे मी तुमच्याशी असे बोलू शकत नाही, तेव्हा ते म्हणायचे की, माझ्या चित्रपटातील लीड एक्ट्रेसने मला सर किंवा मिस्टर आनंद म्हटले तर मग मला तिच्यासोबत रोमान्स करणं अवघड होईल.” ‘गाइड’ हा आपला आवडता चित्रपट असल्याचे सांगताना एकदा वहिदा रहमान म्हणाल्या होत्या की, “या चित्रपटासाठी मला पहिल्यांदाच पुरस्कार मिळाला. त्यावेळी मला हा पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते कारण लोकांचा असा विश्वास होता की, या चित्रपटातील माझ्या भूमिकेबद्दल कोणीही सहानुभूती दाखवत नाही आणि त्यावेळी अशा भूमिकांना पसंती दिली जाते ज्यांना पाहून वाईट वाटेल, म्हणून जेव्हा मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा मला खूपच आश्चर्य वाटले.”