सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
‘मी येतोय असे काही जण म्हणत आहेत. परंतु कुणाला यायला आमची बंदी नाही. बंदी तर तुमच्याकडे आहे. आमदारांनी विट्यासाठी काय दिले ? असा प्रश्न विचारता. पण तुम्ही पण दोनवेळा आमदार होता. तुम्ही तर कायद्याचे पदवीधर आहात पालिका अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. विधानसभेच्या प्रोसेडिंगमधून माहिती घ्या. विट्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी माझे योगदान नसल्याचे सिध्द झाले तर मी उद्याच्या विधानसभेचा उमेदवारी अर्जसुध्दा भरणार नाही’, अशा शब्दांत खुले आव्हान आमदार अनिल बाबर यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना दिले. विट्यातील पंचफुला मंगल कार्यालयात खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या आयोजित केलेल्या निश्चय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील, शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते सभापती मनीषा बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार अनिल बाबर म्हणाले, ‘विरोधकांना सध्या मतदारसंघात एकाही गावात जाऊन माझ्याविरूध्द टीका करण्याचा मुद्दाच नसल्याने विट्यासाठी आमदारांनी काय दिले? असा अपप्रचार सुरू केला आहे. विट्यासाठी मी दिलेल्या विकासकामांची यादी योग्यवेळी प्रसिध्द करू. पण सर्वांत महत्वाचा विट्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माझे योगदान नसल्याचे सिध्द झाले तर निवडणूकसुध्दा लढविणार नाही. पण लक्षात ठेवा निवडणूक झाल्यानंतर विटा शहरातील गल्ली बोळातील रस्तेसुध्दा तुम्ही ना हरकत द्या अथवा ना द्या मी करून दाखविणार आहे’. असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
तसेच ‘फेसबुक आणि व्हॉटसअपवर तुम्ही माझ्यावर किती जरी टीका केली तरी लक्षात ठेवा. फेसबुक आणि व्हॉटसअपची निर्मिती झाली नव्हती तेव्हापासून मी राजकारणात आहे. तेव्हा लोकांनी दिलेले मला हदयातील स्थान कसे डिलेट कराल. तेव्हा काही लोकांना पोटदुखीचा आजार झाला आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या आयोजित केलेल्या निश्चय मेळाव्याच्या माध्यमातून आमदार बाबर गटाने विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे.