हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी पहिला भेटत आहेत. आता आगामी निवडणूक आल्यामुळे तर या घडामोडींना जास्त वेग आला आहे. मुख्य म्हणजे, या सगळ्यात आता अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट झाल्याची बातमी समोर येत आहे. आज सकाळी ठीक 9:30 वाजता अनिल देशमुख यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी या दोघांमध्ये तासभर चर्चा पार पडली. त्यामुळे या दोघांमध्ये अनपेक्षित झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
अनिल देशमुख आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. याची भेट नक्की कोणत्या कारणावरून झाली हे अद्याप उघडकीस आलेले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. मात्र एका खंडणी प्रकरणामुळे त्यांना या पदावरून उतरावे लागले. तसेच त्यांनी याप्रकरणी तुरुंगवास देखील भोगला आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतरच राष्ट्रवादीत (NCP) फूट पडली. याची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राज ठाकरे यांचे राजकिय संबंध ताणले गेले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून शरद पवारांवर टीका केली जात आहे. तर शरद पवार देखील विरोधकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. अशा काळात झालेली देशमुख यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली असावी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे या भेटीपूर्वी देशमुख आणि राज ठाकरे यांच्या दोन वेळा फोनवर बातचीत झाली होती. त्यानंतरच या दोघांच्या भेटीचे नियोजन ठरवण्यात आले.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना खंडणी प्रकरणात आपल्याला कसे अडकवले गेले याची माहिती दिली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, राजकीय सोबत वैयक्तिक चर्चा देखील या दोघांमध्ये झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. मात्र अद्याप या दोघांकडून देखील या भेटीचे मुख्य कारण सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे या भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.