धुळे प्रतिनिधी । सोमवारी राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. गेली अनेक दिवस सुरु असलेली धावपळ काल शांत झाली.विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवारांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. परंतु धुळ्यातील अनिल गोटे मात्र मतदान पार पडल्यानंतरही एका वेगळ्याच कामात व्यस्त होते. मागील काही निवडणुकांपासून ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला जात असल्याने त्यामध्ये काही फेरफार होतो की काय म्हणून गोटे हे चक्क या गाड्यांच्या बाहेर आपल्या वाहनात ठिय्या मांडून होते. पहाटे तीन वाजता ज्या ठिकाणी या मशीन ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी गोटेंनी ठिय्या मांडला होता.
दरम्यान ईव्हीएम मशीन संशयाच्या भोवऱ्यात असल्याने जवळपास सर्वच पक्षांकडून बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. परंतु निवडणूक आयोगाने हि विनंती फेटाळून लावत ईव्हीएम मशीन हॅक करता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केलं होत. तसेच ईव्हीएम मशीन मध्ये फेरफार होऊ नये यासाठी मतदान केंद्राच्या ३ किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती.