हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बंडखोरीनंतर शिंदे गट व शिवसेना यांच्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कारण शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या समर्थक आमदार, खासदारांना फोडण्याची रणनीती आखली जात आहे. काही प्रमाणात आमदार फोडल्यानंतर आता खासदार फोडण्याच्या तयारीत असलेल्या शिंदे गटाने आता उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका दिला आहे. काल रात्री शिवसेना खासदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली असून काही खासदारांनीही बंडखोरी करण्याची तयारी केली आहे.
उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्या दृष्टीने शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. याआधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करत आपल्या सोबत सूरतला 20 आमदारांचा गट सोबत नेला होता. अशा प्रकारे शिवसेनेतील एकतृतियांश आमदार फुटल्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला. आता शिंदे गटासोबत शिवसेनेचे 40 आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. तरीही त्यांच्याकडून आता खासदार फोडण्याचे काम केले जात आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी काल रात्री उशिरा बैठक झाली आहे. आमदारांप्रमाणेच शिंदे गट दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आमदार, नगरसेवकांनंतर उद्धव ठाकरेंना शिंदे आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत.