औरंगाबाद – ऑनलाईन कुरिअरने पंजाब येथून तलवारीचा साठा मागितल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. त्याला आजपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. कुर्हेकर यांनी दिले. अफरोज पठाण बाबु पठाण (22, रा. भाग्यनगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे.
ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करून पंजाब राज्यातील जालिंधर आणि अमृतसर या शहरातून मोठ्या प्रमाणात तलवारीचा साठा डी.टी.डी.सी कुरिअरच्या माध्यमातून शहरात येणार असल्याची माहिती क्रांतिचौक पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी निराला बाजार येथील डी.टी.डी.सी.या कुरिअर कार्यालयावर छापा मारुन विविध आरोपींच्या नावे आलेले सात बॉक्स जप्त केले. त्यात 37 तलवारी आणि 1 कुकरी असे 38 शस्त्रे आढळले होते. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास खटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी आरोपी अफरोज पठाण याने बनावट नाव व पत्याच्या याआधारे कुरिअरने 16 तलवारींची मागणी केल्याचे कबुल केले आहे. त्याने यापूर्वी देखील अशा प्रकारे तलवारी मागविल्या होत्या काय, तलवारी मागविण्याचा नेमका उद्देश काय होता याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.