मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

man suicide for maratha aarakshan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली प्रतिनिधी : रमाकांत पोले
सध्या संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)  मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. त्यातच आता हिंगोली जिल्हयातील शेवाळा शिवारात एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना गुरुवार दि.२६ ऑक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. नवनाथ उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय २३) असे तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

देवजना येथील रहिवाशी असलेला नवनाथ कल्याणकर हा तरुण ट्रॅक्टरवर काम करत होता. सध्या सोयाबीनच्या मळणी यंत्रासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता असल्याने ते सकाळीच घरुन शेवाळा शिवारातील एका शेतात सोयाबीन काढणीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी एका शेतात मळणी यंत्र सुरु करुन बाजुलाच जाऊन झाडाला गळफास लावुन आत्महत्या केली. दरम्यान, मळणी यंत्रामध्ये सोयाबीन जास्त प्रमाणात अडकल्यामुळे ट्रॅक्टर बंद करण्यासाठी मजुरांनी त्यांना आवाज दिला. मात्र त्यांच्याकडून प्रतिपाद मिळत नसल्याने मजुरांनी त्यांचा शोध सुरु केला. यावेळी त्यांचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला. या प्रकाराची माहिती गावकर्‍यांना मिळाल्यानंतर गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकाराची माहिती आ.बाळापुर सपोनि सुनिल गोपीनवार उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार रामदास ग्यादलवाड, राजीव जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेटी दिली.

मयत नवनाथ कल्याणकर यांच्या खिशात चिठी सापडली असल्याचे सुत्रांनी सांगितले. मयत नवनाथ यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मयत नवनाथ यांच्या पश्‍चात आई, वडिल व एक भाऊ असा परिवार आहे. त्यांचा भाऊ छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी काम करतो तर घरी सव्वा एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. मयत नवनाथ हे मराठा आरक्षण चळवळीमध्ये सक्रीय होते. मागील काही दिवसात झालेल्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.