औरंगाबाद – दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. दहावीसाठी आतापर्यंत 1 लाख 77 हजार 135 तर बारावीसाठी 1 लाख 61 हजार 942 विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती विभागीय मंडळाचे प्रभारी सचिव आर. पी. पाटील यांनी दिली.
कोरोनाकाळातील ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा ताण येत असल्याने या वर्षी 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच 40 ते 60 गुणांसाटी 15 मिनिटं तर 80 ते 100 गुणांसाठी अर्ध्या तासाचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विलंब शुल्क न भरता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची परवानगी असेल, अशी घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 23 डिसेंबरला केली होती.
या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षा नियमित मूल्यांकन पद्धतीने होणार आहेत. तसेच लेखी परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 दरम्यान होतील. तर बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 या काळात पार पडतील. कोरोना नियमावलीचे पालन करत बोर्डातर्फे ऑफलाइन पद्धतीने परीक्षांची तयारी करण्यात येत आहे. परीक्षा व्यवस्थित पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत, तर दहावी परीक्षेचा निकाल जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर केला जाईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.