व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शहरातील दर्गा परिसरात तब्बल 800 बेकायदा नळ

 

औरंगाबाद – बेकायदा नळ घेऊन लाखो लीटर पाण्याची चोरी होत असल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. यामुळे महापालिकेने बेकायदा नळ शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन केले असून, या पथकाने शुक्रवारी गादिया विहार, त्रिशरण चौक व पडेगाव भागात सर्वेक्षण केले असता तब्बल 800 पेक्षा अधिक बेकायदा नळ आढळून आले. हे बेकायदा नळ आता बंद केले जाणार असल्याचे पथकप्रमुख तथा मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.

 

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात बेकायदा नळांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे नळ मुख्य पाइपलाइनवरून घेण्यात आल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. बेकायदा नळावर चार दिवसांपूर्वीच पथकाने भावसिंगपुरा, नवयुग कॉलनी भागात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी शहानुरमियाँ दर्गा परिसरातील गादीया विहार, त्रिशरण चौक व पडेगाव भागात पाहणी केली असता या ठिकाणी 800 पेक्षा अधिक बेकायदा नळजोडण्या मुख्य पाइपलाइनवरून घेतल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

 

यातील काही कनेक्शन अधिकृत असू शकतात पण ते मुख्य लाइनवर असल्याने बेकायदा ठरतात. त्यामुळे शनिवार किंवा रविवारी बेकायदा नळजोडण्यांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी बेकायदा नळ न घेता रीतसर अर्ज करून आपले नळ अधिकृत करून घ्यावेत, असे आवाहन वाहुळे यांनी केले आहे.