औरंगाबाद – सध्या शहरात लसींचा साठा वाढताच नागरिकांचा प्रतिसाद थंडावला असून, दररोज सुमारे चार ते पाच हजार एवढेच लसीकरण होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या टोकनसाठी लसीकरण केंद्रावर लागणाऱ्या रांगा आता बंद झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून लस घेण्यासाठी रांगेत धक्काबुक्की होत असल्याचे चित्र होते पण महापालिकेकडे सध्या एक लाखापेक्षा जास्त कोविशिल्ड लसी आहेत. असे असताना लस घेण्यासाठी नागरिकांचा शोध घ्यावा लागत आहे.
कोरोना प्रतिबंध लसीकरणासाठी महापालिकेला ११ लाख ७६ हजार ९९९ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महापालिकेने आत्तापर्यंत चाल लाख ८४ हजार ७६७ जणांना पहिला डोस दिला आहे तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या दोन लाख चार हजार ३५७ एवढी आहे. १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केल्यानंतर कोविशिल्ड लसींचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे लसीकरणाची गती मंदावली होती. त्यात दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने नागरिक कोरोनाबाधित झाले. त्यामुळे नागरिकांची लसीकरण केंद्रावर गर्दी होत होती.
अनेक केंद्रावर लसीसाठी माऱ्यामाऱ्या होतील असे चित्र होते. टोकन घेण्यासाठी पहाटेपासून रांगा लागत होत्या. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकार घडले. पण गेल्या आठवड्यापासून लसीकरण केंद्रावरील चित्र पालटले आहे. महापालिकेला लसींचा मुबलक साठा प्राप्त झाला. त्यात बजाज समूह लसीकरणासाठी धावून आला. शहरासाठी एक लाख १२ हजार ५०० एवढ्या लसी बजाज कंपनीने दिल्या आहेत. २३ केंद्रावर बजाज व महापालिकेतर्फे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे केंद्रावर रांगा गायब झाल्या आहेत. टोकन पद्धतही बंद झाली आहे. दिवसभरात कधीही गेल्यानंतर नागरिकांना लस मिळत आहे. लसीसाठी आता नागरिकांना आवाहन करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. एका केंद्रावर केवळ ४० ते ५० एवढ्याच प्रमाणात लसीकरण होत आहे.