Friday, June 2, 2023

मरणानंतरही यातनाच ! अंत्यविधीला जागाच नसल्याने मृतदेह आणले थेट तहसीलला

बीड – जिल्ह्यातील केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील एका वृद्ध महिलेचे मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. तिचा अंत्यविधी करण्यासाठी गावात मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने नेमका अंत्यविधी कुठे करावा ? या अडचणीने संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी त्या महिलेचा मृतदेह बुधवार तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.

तालुक्यातील सोनेसांगवी येथील वृद्ध महिला लक्ष्मीबाई शहाजी कसबे यांचे मंगळवार रोजी रात्री उशिरा दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. परंतू तिचा अंत्यविधी करण्यासाठी मगासवर्गीय समाजाची स्मशानभूमी उपलब्ध नाही. पूर्वी हा समाज शेजारच्या माळेगाव शिवारातील सरकारी गायरान जमिनीत अंत्यविधी करीत होता. सध्या त्या गायरान जमिनीत काही वर्षांपूर्वी मागासवर्गीय समाजातील भूमिहीन लोकांनी अतिक्रमण करून ते जमीन कसत आहेत. त्यामुळे त्यांना तेथे अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तर सोनेसांगवी ग्रामपंचायतीने सोनेसांगवी येथील खुल्या जागेत स्मशाभूमी करण्याचा ठराव घेतलेला आहे.

मात्र त्या जागे शेजारील लोकांनी विरोध केल्यामुळे संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका ट्रॅक्टरमध्ये मृतदेह तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवले आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. तहसीलदार दुलाजी मेंडके हे सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे, सरपंच विजयकुमार ईखे, रिपाईचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, रवींद्र जोगदंड, मुकुंद कणसे या ग्रामस्थांशी संवाद साधत पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप दहीफळे व केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.