नाईटलाईफ संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांनी सुशांतसिंह राजपूतचा बळी घेतला; आशिष शेलारांच्या निशाण्यावर नक्की कोण?

मुंबई | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सीबीआयने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. यावेळी रिया चक्रवर्तीचे ड्रग डिलरशी असलेले संबंध समोर आले आहेत. आता यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी नाईटलाईफ संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांनी सुशांतसिंह राजपूतचा बळी घेतला असं खळबळजनक ट्विट केले आहे. शेलार यांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे तर नाहित ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते तसेच “ड्रग- पब-अँड पार्टी” गँगने सुशांत सिंह रजपूतचा बळी घेतला! या “ड्रग-पब-पार्टी” टोळीचे सदस्य कोण आहेत? त्यांचे संरक्षण कोण करीत आहे? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा कोणी बदलली? #ED #CBI सत्य समोर आणते आहे! खरे चेहरे ही समोर येतीलच!! न्याय होईल! अशा आशयाचे ट्विट शेलार यांनी केले आहे.

दरम्यान, सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी होत आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूमागे पैशांच्या गैरव्यवहाराची शक्यता तर नाही ना याची तपासणी करण्याचं काम ईडी करत आहे. यामुळे सुशांतच्या मृत्यूबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत.