हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “यंदाच्या अर्थसंकल्पात भाजपच्या जुन्या घोषणांना मूठमाती देण्यात आली आहे. देशाची दिशाभूल करण्यासाठी पुढील 25 वर्षांच्या विकासाचे नवे गाजर दाखवण्यात आले आहे, अशा शब्दात चव्हाण यांनी टीका केली आहे.
मंत्री अशोक चव्हाण यांनी आज माध्यमाशी संवाद साधत केंद्रीयमंत्री सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, आज मांडलेल्या अर्थसंकल्पास भाजपच्या काही नेत्यांनी ऐतिहासिक अर्थसंकल्प म्हणून म्हंटले आहे. महाभारतातील श्लोक आणि ‘अमृतकाल’, ‘गतीशक्ती’सारखे मोठमोठे शब्द वापरून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे वजन वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी, बेरोजगार, नोकरदार, गरिबांसाठी त्यात काहीच नसल्याने तो एक पोकळ अर्थसंकल्प ठरलेला आहे.
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या, 100 स्मार्ट सिटी, महागाईवर नियंत्रण अशा अनेक घोषणा भाजपने केंद्र सरकारने केल्या होत्या. मात्र, अशा अनेक जुन्या महत्वाकांक्षी घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याची दिसते. हे अपयश झाकण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २५ वर्षांच्या विकासाचे नवे स्वप्नरंजन करण्यात आले आहे. ही देशाची दिशाभूल व फसवणूक आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.