हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचे जलालपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रणजितभाई पांचाल यांच्या प्रचारार्थ विजलपूर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप गुजरातचा विकास केल्याचा दावा करते. मग ते फक्त विकासाच्या नावावर मते का मागत नाहीत? मते मिळवण्यासाठी दरवेळी धार्मिक धृविकरणाचे कारस्थान का केले जाते? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी नुकतीच नवसारी व सुरत जिल्ह्यातील जलालपूर, लिंबायत व उधना मतदारसंघाचा दौरा करून काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. यावेळी ते म्हणाले, यंदा सत्तारूढ भाजपविरूद्ध लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. भाजपविरोधात सुप्त लाट आहे. त्यामुळेच निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये भाजपच्या मतदानाची टक्केवारी ढासळत असल्याचे दिसून येते. येत्या 8 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीत गुजरातमध्ये सत्ता परिवर्तन होऊन काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्याचे दिसेल.
आठ वर्षांपूर्वी ‘बहुत हुई महंगाई की मार’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेली भाजप आज महागाईवर चकार शब्द काढायला तयार नाही. पेट्रोल,डिझेल, स्वयंपाकाच्या सिलिंडरसारख्या जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. गुजरातमध्ये सार्वजनिक आरोग्य व शिक्षण व्यवस्था ढासळली आहे. चांगली आरोग्य सेवा आणि चांगले शिक्षण हवे असेल तर सर्वसामान्यांना ऐपत नसतानाही हजारोंचा खर्च करून खासगी क्षेत्राकडे जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे चव्हाण पुढे म्हणाले.
विजलपूर येथील सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त, नवसारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेश पटेल, गुजरात प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक कोठारी, काँग्रेस नेते धर्मेश पटेल, धुळे जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शाम सनेर, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष मोईज शेखआदी उपस्थित होते.
हेच भाजपचे गुजरात मॉडेल का?
भाजपच्या ‘गुजरात मॉडेल’च्या दाव्यातील फोलपणा जनतेला कळून चुकला आहे. मोरबीला पूल कोसळून 130 जणांचा बळी जातो. पण कठोर कारवाई होत नाही. दारुबंदी असताना गुजरातमध्ये सर्रास दारुविक्री होते. विषारी दारू पिऊन लोकांचे बळी जातात. पण कोणाला काहीच सोयरसूतक राहिलेले नाही. हेच भाजपचे ‘गुजरात मॉडेल’ आहे का? मानवी संवेदनांचा अभाव असलेला विकास हा खरा विकास असू शकत नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.
भारत जोडो यात्रेने देशात परिवर्तनाची लाट निर्माण केली
यावेळी चव्हाण यांनी भारत जोडो यात्रेचाही आपल्या भाषणात उल्लेख केला. या यात्रेने देशात परिवर्तनाची लाट निर्माण केली आहे. लोकांची ‘मन की बात’ ऐकणारे खा. राहुल गांधी प्रत्येकाला भावू लागले आहेत. रोज हजारो लोक त्यांना भेटतात. आपल्या व्यथा मांडतात. आता केवळ खा. राहुल गांधीच देशाचे नेतृत्व करू शकतात, ही लोकभावना प्रकर्षाने दिसून येत असल्याचे चव्हाण म्हणाले.