सहाय्यक फौजदार विजय शिर्केला एसपींनी केला हवालदार : राजेंद्र चोरगे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
गुरूकुल स्कूल प्रिन्सिपल, पदाधिकारी यांना बेकायदा ताब्यात ठेवून स्कूलवर दरोडा टाकायला मदत केल्याची फिर्याद चेअरमन राजेंद्र चोरगे यांनी दाखल केली होती. यात सहाय्यक फौजदार विजय शिर्के याला जबाबदार धरून त्याला हवालदार केल्याची शिक्षा अधीक्षक बन्सल यांनी केली. दरम्यान, केवळ खात्यांतर्गत शिक्षा न देता तत्कालीन एलसीबी प्रमुख पद्ममाकर घनवट सह शिर्केवर नोकरीतून बडतर्फ करून कायदेशीर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी राजेंद्र चोरगे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, गुरूकुल संबंधित सर्वांना एकाच वेळी ताब्यात घेऊन दरोडा टाकण्याच्या प्रकरणात राजेंद्र चोरगे यांनी पद्माकर घनवट आणि विजय शिर्के विरोधात ब्लॅक मेलिंग, भीती घालून लाखो रूपये उकळणे आणि दरोड्याला साहाय्य करणे असे आरोप पुराव्यानिशी केले होते. पोलीस अधिक्षक आणि संबंधित प्राधिकरणाकडे हे लेखी आरोप होते. या आरोपावरून 2018 पासून घनवट आणि शिर्केच्या विविध स्तरावर एकूण पाच शासकीय चौकश्या झाल्या. दरम्यान, घनवट यांची पुण्याला बदली झाल्याने पुणे ग्रामीण अधिक्षकांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कळविले होते.

चार वर्षात झाल्या पाच चौकश्या

साता-यात पोलीस उपअधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाई उपअधिक्षक टिके यांनी विविध चौकशी केल्या होत्या. याच प्रकरणात कराड उपअधिक्षक रणजित पाटील यांनी केलेली चौकशी चुकीची असल्याने त्यांच्यावर ताशेरे ओढून ती रद्द केली होती. त्यानंतर विजय शिर्के यांची विभागीय चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अजित बोऱ्हाडे यांचे मार्फत करण्यात आली. अखेर या चौकशींच्या फे-यांत राजेंद्र चोरगे यांनी केलेल्या आरोपांतले तथ्य समोर आले आणि सिध्द झाले. त्यामुळेच अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी सहाय्यक फौजदार विजय शिर्केला पदावरून हाकलून देत हवालदार केले.

गुन्हा तोच तर पोलीसांना आणि सामान्यांना न्याय वेगळा का?

कित्येक पदाधिका-यांना बेकायदा ताब्यात ठेवून दरोडयाला मदत करण्यासारख्या एकदम गंभीर प्रकरणात सामान्य माणसाला तुरूंगात जावे लागले असते. पण पोलीस खात्याची वर्दी आड करून शिर्केला केवळ पदावरून हटवणे आणि घनवटला अद्याप मोकळे सोडणे हा न्याय नाही. उलट हे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार आहे. आरोपांत तथ्य सापडले आहे, तर यांच्यावर सामान्य जनतेप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे ही राजेंद्र चोरगे यांची प्रमुख मागणी आहे. आणि कायद्यामध्ये तशी थेट तरतूद आहे.

गुन्हा दाखल झाला तर अनेक प्रकरणे येतील उजेडात

गुन्हा दाखल झाल्यावरच गुरूकुलचे पदाधिकारी, प्रिन्सिपल, कर्मचारी यांना ताब्यात घेऊन दरोड्याची सुपारी घेतल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट व सिध्द होणार आहे. आपल्या प्रमुख मागणीकडे दुर्लक्ष झाले, तर या प्रकरणात आपण न्यायालयात जाणार असल्याचे राजेंद्र चोरगे यांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलीस खात्याचा वापर करून दरोड्यासारखे गुन्हे सरेआम साता-यात घडत होते. सातारकरांसाठी हे धक्कादायक आहे. त्यामुळे याच काळातील अनेक प्रकरणे चौकशीच्या रडारवर येणार आहेत. अश्या प्रकरणांमुळे पोलीस खाते बदनाम होत असल्याने राज्य शासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे जाहीरपणे बोलले जात आहे. गुरुकुल प्रकरणात समोर पुरावे असूनही कोणतीच कारवाई न केल्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते याही वादाच्या भोव-यात आहेत, असेही राजेंद्र चोरगे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.