…तर अशी बेताल वक्तव्य करायची हिम्मतच झाली नसती; मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून सामनातून विरोधकांवर प्रहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणवरून शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर कडाडून टीका केली आहे. ‘ सामना’ मध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राचे सरकार अशाप्रकारे खिळखिळे करायचे या डावपेचात अशा संविधानिक संस्था सक्रिय होतात ही बाब चिंताजनक आहे. महाराष्ट्रातला विरोधी पक्ष रोज उठून “आज या मंत्र्याला घालवणार, उद्या त्या मंत्र्याची ‘विकेट’ पडणार” अशी वक्तव्य करतोय. केंद्रीय तपास यंत्रणा हातात नसत्या तर त्यांना अशी ही बेताल वक्तव्य करण्याची हिंमतच झाली नसती. राज्य बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे असं म्हणत शिवसेनेने विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे द्वेष आणि विखार नव्हता

यापूर्वीही महाराष्ट्रात विरोधी पक्षांने सत्ताधाऱ्यांवर आरोप करून धुरळा उडवला. अनेकदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जावे लागले आहे. पण त्यांच्यात आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे द्वेष आणि विखार भरलेला नव्हता. विरोधी पक्षाच्या हातात खरोखरच काहीतरी पुरावे होते म्हणून हल्ले केले. आज साबणाचे बुडबुडे सोडून ‘बॉम्ब बॉम्ब’ अशी भीती निर्माण केली जात आहे. महाराष्ट्रात कुठे काही सळसळ झाली की सीबीआय आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेला घुसवायची संधी शोधायची हे राज्यातील विरोधी पक्षाचे आद्यकर्तव्य झाले आहे. राज्याची सत्ता त्यांना हवी आहे व त्यासाठी सध्या आहे ते उलथावयाचे आहे. त्यासाठी विरोधी पक्ष कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार आहे. मात्र ते जमेल असं दिसत नाही असंही शिवसेनेनं सामना मधून म्हंटले आहे. अनिल देशमुख प्रकरणावर पुढे मत मांडताना, देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर होते हे मान्य केले तरी या आरोपाची सत्यता काय? खरं खोटं अजून सिद्ध व्हायचे आहे असं सामनामध्ये म्हटलं आहे.

त्यांचा बोलावता आणि करवता धनी कोण?

तसेच परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावर कायम ठेवले असते तर हे वसुलीचे आरोप त्यांनी केले नसते. त्यांचे पद ‘वाझे गेट’ प्रकरणात गेल्यावर त्यांनी हा पत्रांचा खेळ केला. परमबीर सिंग यांनी पत्र लिहिले आणि खळबळ उडवून दिली पण त्या पत्राचा प्रवास पाहता त्यांचा बोलविता धनी आणि करविता धनी कोण दुसराच आहे हे आता पटू लागले आहे. अशा प्रकारचे अनेक मुद्दे शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून मांडले आहेत.

Leave a Comment