कणकवली | कोकणातील जानवली- आदर्शनगर येथील एका युवकावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील चार युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाैघेही 20 ते 25 वयोगटातील असून हा हल्ला प्रेमसंबधातील वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आज या संशयितांना कणकवली न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
याबाबतची माहिती अशी, जानवली- आदर्शनगर येथील शिवानंद दत्तात्रय जंगम (वय- 23) या युवकावर तेथीलच एका कन्स्ट्रक्शनच्या दोन बिल्डींगमधील जागेत अज्ञात चौघांनी डोक्यावर काठ्या आणि दगड मारून चार दिवसापूर्वी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी कणकवली पोलिसांच्या पथकाने कराड येथून यातील मुख्य संशयित प्रेमकुमार नलवडे (रा. कराड) व त्याच्या तीन साथीदारांना शिताफीने ताब्यात घेतले. चौघेही 20 ते 25 वयोगटातील आहेत. प्रेमसंबंधातील वादातून हा हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याची माहिती कणकवलीचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली.
सदरची घटना शुक्रवार 2 डिसेंबर रोजी रात्री 9 वा. च्या सुमारास घडली होती. दुसऱ्या दिवशी प्रेमसंबंधातील वादातून हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट सायंकाळी जखमी शुध्दीवर आल्यानंतर त्याचे जाबजबाब पोलिसांनी नोंदवले. ही घटना घडल्यानंतर आरोपी पळून गेले होते. हल्लेखोर मुंबईला पळून गेल्याचे समजल्यानंतर पोलिस पथकाने मुंबई गाठली. हल्लेखोर मुंबईतून कराडला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस पथक कराडला रवाना झाले. पोलिसांनी मुख्य संशयित प्रेमकुमार नलवडेसह चौघांना कराड येथे ताब्यात घेतले, त्यांना सोमवारी कणकवली पोलिस ठाण्यात आणले.