औरंगाबाद | औद्योगिक परिसरात गुंड व ब्लॅकमेल करणाऱ्यांची दहशत वाढतच चालली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील भोगले कंपनीत कामगार आणि व्यवस्थापकातील वादाची घटना ताजी असताना आता एका कंपनीच्या एचआर व्यवस्थापकाला रस्त्यात अडवुन १० ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास वाळूज उद्योगनगरीत घडली. या मारहाणीत शिरीषकुमार राजेभोसले (39, रा.नक्षत्रवाडी) हे जखमी झाले आहे. कंपनीत कामगार पुरविण्याचा ठेका देण्याच्या कारणावरुन ही मारहाण झाल्याचा आरोप जखमी व्यवस्थापक भोसले यांनी केला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, वाळूज एमआयडीसीतील जोगेश्वरी शिवारात असलेल्या श्रीगणेश कोटींग या कंपनीत शिरीषकुमार राजेभोसले (रा.नक्षत्रवाडी ता.जि.औरंगाबाद) हे एचआर व्यवस्थापक म्हणून काम करतात. मंगळवारी सांयकाळी कंपनीतील कामकाज आटोपल्यानंतर दुचाकीवरून नक्षत्रवाडी येथील घराकडे निघाले होते. काही अंतरावर एम सेक्टरजवळ दुचाकीवरुन आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने राजेभोसले यांना अडवले. दुचाकी अडवून त्यांच्याशी वाद घालत लाठ्या-काठ्याने मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे राजेभोसले यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा करण्यास सुरवात केली. यावेळी राजे भोसले यांना बेदम मारहाण करुन घटनास्थळावरुन पसार झाले. या मारहाणीत राजेभोसले यांचा डावा हात फॅक्चर झाला आहे. डोळ्याजवळ ठोसे लगावल्याने मोठी जखम झाली असून सुदैवाने डोळा बचावला आहे. याशिवाय मुकामार लागल्याचे राजेभोसले यांनी सांगितले.
राजेभोसले यांच्या फिर्यादीवरून शरद किर्तीकर, किरण किर्तीकर यांच्यासह 6 ते 7 जणांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जाणांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.
सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री
औरंगाबादेत उद्योजकांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यामुळे उद्योजकांनी एकत्र येत आवाज उठवला असून जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. यावर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तातडीने दखल घेत सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन त्यांना त्रास देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.