टीम, HELLO महाराष्ट्र। सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याची वाटचाल आता गुन्हेगारी पुण्याकडे झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली असून, चोरी, दरोड्यांसारख्या घटना रोजच घडताना पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी चिखली परिसरातील दोन एटीएम फोडल्याची घटना ताजी असतानाच, गुरुवारी पुन्हा एक एटीएम फोटण्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलातील म्हात्रेवस्तीवर आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. या एटीएम मधून पैसे काढण्याचा बहाणा करत एक चोरटा पहाटे दोन वाजता एटीएम मध्ये येऊन पाहणी करून गेला. त्यानंतर पहाटे चार वाजताच्या सुमारास तीन चोरटे एटीएम मध्ये आले. आतमध्ये आल्यावर अगोदर या चोरटयांनी सीसीटीव्ही कॅमेरा बाहेरच्या दिशेला फिरवला. त्यानंतर एटीएमची तोडफोड करत फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. हे चोरटे स्थानिक असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेत एटीएम मधून पैसे चोरी गेले नसले तरी सुरक्षाव्यस्थेवर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. कारण चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडण्याचे दोन प्रकार उघडकीस आल्यानंतर, सर्व पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी एटीएम सेंटरची पाहणी करण्यासाठी संयुक्त पथक नियुक्त केले. मात्र तरी देखील शहरात सहा एटीएम फोडण्याचे प्रकार घडले आहेत.