औरंगाबाद | वडापाव खाऊ घालण्याच्या बहाण्याने सात वर्षीय बालिकेला तिच्या आईकडून बळजबरी घेऊन जाऊन रात्रीच्या वेळी शेतात मारहाण करत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेतील आरोपीस पोक्सोसह इतर विविध कलमांखाली २० वर्षे सक्तमजुरी व ८९ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सोमवारी सुनावली. बंडू रोहिदास राठोड असे आरोपीचे नाव असून दंडाच्या रकमेपैकी २० हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचेही आदेशात म्हटले आहे.
याप्रकरणी पीडितेच्या आईने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात ३१ जुलै २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती. बंडू याने ३० जुलै २०१८ रोजी पीडितेला तिच्या आईला सांगून व परत आणून देतो म्हणून घरातून नेले, मात्र बराच वेळ झाल्यानंतरही पीडिता व बंडू राठोड परतला नसल्याने फिर्यादीने जयभवानीनगरात शोधही घेतला. दुसरा दिवस उजाडला तरी आला नसला तरी मुलीला आणून सोडेन या विश्वासाने फिर्यादी मयूरपार्क येथे कामाला गेली. तिथे चिकलठाणा पोलिसांनी पीडितेला फिर्यादीकडे सोपवले. यावेळी पीडितेने राठोड याने गिरनार तांडा भागात नेऊन नैसर्गिक, अनैसर्गिक कृत्य केल्याचे सांगितले. अत्याचारानंतर तो तेथेच सोडून गेला. त्यानंतर रात्रभर आपण शेतातच थांबले नंतर सकाळी एका म्हशीपालकाने आपल्याला पाहिले. कपडे देऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी फिर्यादीजवळ पीडितेला सोडवल्यानंतर घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश व ज्ञानेश्वरी नागुला यांनी १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये पीडिता, फिर्यादी व प्रत्यक्षदर्शीचे जबाब महत्वाचे ठरले. याप्रकरणी भादंवि ३६३ नुसार १ वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिला कारावास, ३६६ (ए) नुसार ३ वर्षे सक्तमजुरी, ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने कारावास, ३७६ नुसार दहा वर्षे सक्तमजुरी, १० हजार दंड, दंड न भरल्यास १० महिने शिक्षा, ३७६ (अ) नुसार १० वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १० महिने कारावास, कलम ३७७ नुसार १० वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड, १० महिने कारावास, पोक्सोच्या ४ (२) नुसार २० वर्षे सक्तमजुरी, २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २० महिने शिक्षा, पोक्सोच्या कलम ६ नुसार २० वर्षे सक्त मजुरी २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २० महिने शिक्षा, ३२३ नुसार तीन महिने सक्तमजुरी, ५० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची शिक्षा सुनावली.
तसेच पोक्सो कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी ५ हजारांचा दंड, दंड न भरल्यास पाच महिने कारावास, पोक्सो कलम १० नुसार ५ वर्षे सक्तमजुरी १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १० महिन्याची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी २० हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे. तपास अधिकारी म्हणून उपनिरीक्षक आर. टी. भदरगे, पैरवी अधिकारी दिलीप कुमार परळीकर यांनी काम पाहिले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा