औरंगाबाद – भारतासह जगभरात पाय पसरणाऱ्या ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शहर आणि जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील यंत्रणाही अलर्ट झाली आहे. औरंगाबादमध्ये महापालिकेच्या आयओसी सेंटरमध्ये 75 बेडचे कोव्हिड सेंटर सुरु केले जाणार आहे. त्याची पूर्ण तयारी झालेली असून तेथे ऑक्सिजनची व्यवस्थाही असेल. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्यास त्यांना याच कोव्हिड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल केले जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
22 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिकेतून एक व्यक्ती कंपनीच्या कामानिमित्त शहरात आला होता. मुंबईत त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात अहवाल निगेटिव्ह आला होता. पुन्हा 23 नोव्हेंबर रोजी त्याची आरटीपीसीआर करण्यात आली. सोमवारीही त्याची चाचणी करण्यात आली. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या व्यक्तीपासून काहीही धोका नाही किंवा ती व्यक्ती देखील सुरक्षित असल्याची माहिती डॉ. मंडलेचा यांनी दिली.
ओमिक्रॉनचा संसर्ग ओळखण्याची यंत्रणा घाटीच्या प्रयोगशाळेत किंवा औरंगाबाद शहरात नाही. त्यामुळे आता शहरात पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे स्वॅब घाटीतून थेट पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी केली जात आहे. अहवाल निगेटिव्ह आला तरी त्यांचा स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्याहून हा अहवाल येण्यासाठी 72 तास लागतात.