औरंगाबाद प्रतिनिधी । गाव खेड्यातील राजकारण कोळून पिलेले दोन दिग्गज नेते जेव्हा आमने-सामने येतात, ती गंमत शब्दात न सांगण्याजोगी ! ग्रामीण बाजाची खमंग फोडणी असलेले रावसाहेब पाटील दानवे अन त्याच गावरान भट्टीत तयार झालेले पहेलवान अब्दुल सत्तार चौफेर बरसले. या दोघांचे बॉम्बगोळे शहराच्या बॉर्डरवर पडले असले तरी हादरे मात्र शहराला बसले. या गावरान मिरचीचा ठसक्यांनी अनेकांना उचक्या लागल्या नसतील तरच नवल !
गेल्या काही दशकात जोमाने शहरीकरण वाढले तरी या आधुनिकतेची सोस कुणालाच नाही. नव्वदीच्या दशकानंतर स्थलांतराच्या लोंढ्यात निर्माण झालेले राजकीय नेतेही स्वतःला ग्रामीण समजतात. एकंदरीत अजूनही शहरावर ग्रामीण भागाचा पगडा दिसून येतो. नाही म्हणता दशकभरात राजकारणाचा बाज काहीसा शहरी झाला तरी सर्वसामान्यांची आवड मात्र ग्रामीण ढंगाची राहिली आहे. त्यामुळेच की काय रावसाहेब दानवे यांच्या ग्रामीण शैलीला मतदार भुलतात, अब्दुल सत्तार यांच्या मराठी शैलीवर फिदा होतात. या दोन्ही नेत्यांचे गारुड जनमानसावर आहे ते यामुळेच ! तसे या दोघांची जुनी मैत्री. राजकारणाच्या आखाड्यात अनेकांना पटकी देणारे हे पहिलवान रात्रीच्या अंधारात एकत्र येतात याचे अनेक किस्से सिल्लोड- भोकरदन तालुक्यातील गाव खेड्यात ऐकायला मिळतात. अगदी शेवटच्या रात्री घोंगडी पांघरून कोण कुणाच्या गावात शिरले याच्याही सुरस कथा जनमानसात आहेत. आम्ही मित्र आहोत खुलेआम कबुली ते देतात अन पक्षात त्यांचे कुणी वाकडेही करू शकत नाही. दोन टोकाच्या विरोधाभासी पक्षात असलेली ही जोडी अजिंक्य ठरली आहे.
दोघांचीही लक्ष शहर –
जनमानसावर छाप असलेल्या या दोन नेत्यांचे लक्ष एक हजार कोटींचे बजेट असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेवर आहे. जिल्हा परिषदेवर तर दोघांचीही नजर असतेच. शहरातल्या जुन्या राजकारण्यांना धोबीपछाड देण्याचे काम या दोघांनी जोमाने चालविले आहे. त्यामुळेच कालच्या जुगलबंदी वर अनेकांचे बारीक लक्ष होते. अपेक्षेप्रमाणेच बॉम्ब पिसादेवीत पडले तरी हादरे मात्र शहराला बसले. अन अनेकांना उचक्याही लागल्या, यात शंका नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’