एकनाथ शिंदेंना पदावरून हटवल्यास भाजपला भोगावे लागतील गंभीर परिणाम.., बच्चू कडूंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन भाजपमध्ये सहभागी झाले. यानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. पुढे जाऊन अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीत बंड करत भाजपशी हात मिळवणी केली. पुढे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. आता सध्याच्या घडीला अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात यावी अशी चर्चा रंगली आहे. मुख्य म्हणजे, याबाबत अनेक भाकीत ही व्यक्त केले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू एक मोठं वक्तव्य केलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवल्यास त्याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील” असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

राज्यात अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा रंगली असताना बच्चू कडू यांनी हे महत्त्वाचे विधान केले आहे. बच्चू कडू यांनी यावेळी म्हटले आहे की, “असं होऊ शकत नाही, पण असं झाल्यास भाजपला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, कारण एकनाथ शिंदे यांचे देखील 5 ते 10 टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास तुमचे काही प्लॅन कामी येणार नाहीत.” यानंतर बच्चू कडू यांनी मराठा, धनगर, मुस्लिम, आरक्षणाच्या प्रश्नाबाबत देखील भाष्य केलं. “सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपवायला पाहिजे. आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आहे” असं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं.

दरम्यान, सध्याच्या घडीला राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यापासून राजकीय वर्तुळात अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या सगळ्यात अजित पवारांकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात यावी या चर्चेने सर्वात जास्त जोर धरला आहे. मात्र, याबाबत शिंदे फडणवीस सरकारकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. तसेच, तिन्ही मंत्री आपापल्या योग्य पदावर स्थित आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.