हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केलेले अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्री बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत मोठं विधान केले आहे. उद्धव ठाकरे हे निर्मळ स्वभावाचे आहेत, मात्र आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घेरलंय अस बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या. आपण जेव्हा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या मार्फतच दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही दिलेला शब्द पाळला. त्यांच्यासारखा सात्विक माणूस पहिला नाही, ते खूप निर्मळ मनाचे आहेत, पण आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घेरलंय. ज्याप्रमाणे ते मातोश्री वरून काम करत होते तसेच काम ते वर्षा वरून करू शकले नाहीत.
आपण सुरतला गेलो तेव्हा बंडखोरी न करता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात समेट करण्यासाठी गेलो होतो असा दावाही बच्चू कडू यांनी केला. मुंबईहून सुरतला जाण्याआधी मी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. पण त्यांचा फारसा समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. मग मला वाटलं की शिंदे आणि ठाकरेंमध्ये समन्वय साधता येईल का? त्यासाठी आम्ही सूरतला गेलो. पण तोपर्यंत तिथे आमदारांची संख्या २९-३० पर्यंत गेली होती. तेव्हा लक्षात आलं की तिथे कुणाची समेटाची मानसिकता नव्हती. सत्तास्थापनेनंतरच तिथून निघण्याची प्रत्येकाची भूमिका होती”, असे बच्चू कडू म्हणाले.