Monday, January 30, 2023

रवी राणांच्या माघारीनंतरही बच्चू कडू म्हणतात, मी उद्या…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील सुरु असलेला शाब्दिक वाद आणि आरोप प्रत्यारोप संपुष्टात आला आहे. रवी राणा यांनी मी शब्द मागे घेतो असं म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे आणि या वादावर पडदा टाकला आहे. मात्र बच्चू कडू यांनी मात्र आपण कार्यकर्त्यांशी बोलून उद्या भूमिका जाहीर करू असं म्हंटल आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यापद्धतीने मध्यस्थी करून हे प्रकरण हाताळलं त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पण कार्यकर्त्यांची भूमिका माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आज संध्याकाळी ६ वाजता आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहोत आणि उद्या जाहीर मेळाव्यात आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू असं बच्चू कडू म्हणाले. माझा आत्माच कार्यकर्ता असलयामुळे त्यांना विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेत नाही असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

खरं तर हा वाद व्हायलाच नको होता. वादाला सुरुवात रवी राणा यांनी केली. माझ्यावर आरोप केल्यानंतरही मी गप्प बसलो असतो तर माझीच बदनामी झाली असती, त्यामुळे त्यावर उत्तर देणं हे मला अयोग्य वाटत नाही. आरोपच असे झाले की माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, त्या आरोपामुळे आयुष्यच बरबाद होत असेल तर आवाज उठवणं गरजेचं आहे असं बच्चू कडू यांनी म्हंटल.

राणा -कडू यांच्यातील वाद नेमका काय –

रवी राणा यांची बच्चू कडू यांच्या वर गुवाहाटीला जाण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप केला होता. थेट बच्चू कडू यांच्या मतदारसंघात जाऊन ना बाप बडा ना भैया … सबसे बडा रुपय्या अशी इथल्या आमदाराची स्लोगन आहे अशी घणाघाती टीका रवि राणा यांनी केली होती. त्यानंतर आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी रवी राणा याना आरोपांबाबत पुरावे देण्यास सांगितलं . तसेच मी जर पैसे घेतले असेल तर मला कोणी दिले पैसे? शिंदेनी दिले कि फडणवीसांनी दिले हे सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे अस बच्चू कडू यांनी म्हंटल. रवी राणा यांनी १ नोव्हेंबर पर्यंत आपल्यावरील आरोपाचे पुरावे दिले नाही तर मी वेगळा निर्णय घेईन असा इशाराच त्यांनी सरकारला दिला. त्यानंतर काल रात्री उशिरा दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक पार पडली आणि यामध्येच या वादावर पडदा पडला.