हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही अपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद देतो म्हणून मला शब्द दिला होता. त्यांचा मला स्वतः फोन आला होता त्यांनी मला सगळं सांगितलं. मी त्यांना बोललो काही हरकत नाही. थोडीशी नाराजी असतेच ती दूर होईल. नाराजी दूर नाही झाली तर अकेला बच्चू कडू काफी है,” असे बच्चू कडू यांनी म्हंटले.
आ. बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मला मंत्रिपदासाठी थांबवले म्हणजे कायमचं थांबवलं नाही, काही दिवसासाठी थांबवलं आहे. ‘नाराज आहे असा विषय नाही, प्रत्येकाला वाटतं मी मंत्री बनले पाहिजे. आता एकत्र राहायचं म्हणजे समजून घ्यावे लागणार आहे.
काही अडचणी वरिष्ठांना असतील तर आपण अंजुने घेतल्या पाहिजेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रीपद देतो म्हणून हा शब्द मला दिला होता. हा शब्द जरी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडून पाळला गेला नसला तरी दुसऱ्या वेळेस जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा मंत्रीपद ते मला देतील, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.