बगाड यात्रा रद्द : प्रशासनाच्या मदतीसाठी कवठेकरांचा एकमुखी निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई तालुक्यातील कवठे येथील बगाड यात्रा दिनांक १ व २ मे रोजी होणार होती. बावधन (ता. वाई) येथील बगाड यात्रा प्रशासनाचे आदेश धुडकावून भरविण्यात आली होती. त्यानंतर कवठे गावाचे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले बगाड १ मे रोजी होण्याची शक्यता प्रशासनाला वाटत होती. त्यानुसार गेले ४ दिवस प्रशासन सतर्क झाले होते. अखेर गावच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचा एकमुखी निर्णय घेत यंदाची बगाड यात्रा रद्द केली आहे.

वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी कवठे गावातील प्रमुखांच्या दोन वेळा बैठका घेतल्या. त्यांना बगाड यात्रा न करण्याचे प्रबोधन केले होते. तसेच कोरेगावचे डी. वाय. एस. पी. तानाजी बरड व सातारा जिल्हयाचे उपजिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी गावप्रमुखांच्या बैठका घेतल्या. बगाड काढण्याची गावाची मानसिकता नसताना व प्रशासनाला मदत करण्याची भावना असतानासुद्धा प्रशासन विश्वास ठेवत नसल्याने काहीकाळ कवठे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रशासनाकडून कडक कारवाईचे संकेत दिले गेले होते. मात्र दिनांक ३० रोजी पुन्हा भुईंजचे स.पो.नि. आशिष कांबळे यांनी सायंकाळी निवडक ग्रामस्थांची बैठक घेतल्यानंतर ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत बगाड काढणार नसल्याचे व प्रशासनास सहकार्य करणार असल्याचे सांगितल्यावर हा पेच सुटला.

दरम्यान वाई तालुका व जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या व त्यामुळे उद्भवत असलेली चिंताजनक परिस्थिती आहे. प्रशासनाच्या आवाहनास कवठे ग्रामस्थांनी सहकार्य करीत यंदाची बगाड यात्रा रद्द केली, असल्याचे जाहीर केले. तसेच कवठेची यात्रा रद्द झाली असल्याने परिसरातील अन्य गावातील लोकांनी कवठे गावामध्ये प्रवेश करू नये असेही आवाहन यावेळी ग्रामस्थांच्याकडून करण्यात आलेले आहे. यावेळी स.पो.नि. सुशील कांबळे यांनी प्रशासन आपल्याला सहकार्य करेल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान गेले २ वर्षे कवठे बगाड यात्रा रद्द होत असली, तरी मानवतेच्या दृष्टीकोन ठेवून केलेले हे कार्य निश्चितच कोरोना रोगापासून गावाचे रक्षणच करील. अशी प्रतिक्रिया यावेळी कवठे ग्रामस्थांनी दिली.

Leave a Comment