हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संकल्पनेतून ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी नुकताच कराड तालुक्यातील कालगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “राज्य सरकारवर निशाणा साधला. शेती आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या विकासासाठी ज्या बँकेची स्थापना करण्यात आली ती भूविकास बँक बुडाली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळत नसून शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या जातात, असा हुकुमशाही पद्धतीचा अन्याय समाजावर होत आहे,” अशी टीका आ. पाटील यांनी केली.
कालगाव, ता. कराड येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, मानसिंगराव जगदाळे, मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, लालासाहेब पाटील, अशोकराव संकपाळ उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने म्हणाले की, सध्या भाजप सरकारकडून लोकशाही संपवण्याचे एक प्रकारचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत आपला जर निर्णय चुकला तर त्यानंतर पुन्हा लोकशाहीप्रमाणे निवडणुका होतील, असे मला वाटत नाही.