पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी काढण्यास राज्य सरकारने मनाई केलेली असताना तो आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली असून समर्थकांनी ठिय्या देवून बसलेले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये एसटीमधून प्रवेश देण्यात येणार आहे. सरकारने सामान्य वारकऱ्यांना पायी वारीस मज्जाव केलेला आहे. मात्र, सरकारचा हा आदेश झुगारून बंडातात्या कराडकर शुक्रवारी आळंदीत दाखल झाले होते. याठिकाणाहून त्यांनी पायी वारीला सुरुवात केली होती. बंडातात्या यांनी सरकारला आवाहन देत सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले होते.
वारकरी आळंदी ते पंढरपूर वारी चालतच जाणार : बंडातात्या
वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच असे बंडातात्या कराडकर सांगितले होते. संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलन देखील केले होते. आता पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांनी वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत येणारच, असे म्हटले होते.