हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली आहे. त्यानिमित्ताने शिंदे गटाचे खासदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील विघ्नहर्ता गणपती मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी, 2024 ला एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी गणपतीकडे नवस केला. तसेच त्यांनी, नवसाचा मोदक देखील घेतला. त्यामुळे आता राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. याअगोदर अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी त्यांच्या कार्यकर्त्याने लालबागच्या राजाच्या चरणी चिठ्ठी ठेवल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता बांगर यांनी एकनाथ शिंदे पुढच्या वर्षी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी नवस केला आहे.
संतोष बांगर यांनी हिंगोली येथील विघ्नहर्ता गणपती मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांचे संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी, “2019 ला मी मोदक घेतला होता आणि एका वर्षात मी आमदार झालो. त्यावेळी माझा नवस पूर्ण झाला होता. आता देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा यावे यासाठी आज प्रार्थना केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी 2024 ला पुन्हा मुख्यंमत्री राहावेत यासाठी नवसाचा मोदक घेतला आहे” अशी माहिती माध्यमांना दिली.
दरम्यान, एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे या दोघांकडे मुख्यमंत्रीपद असावे यासाठी दोन्ही गटाचे नेते गणरायाकडे नवस बोलताना दिसत आहेत. त्यामुळे आता गणराया नक्की कोणाची इच्छा पूर्ण करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्य म्हणजे, सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असले तरी पुढील काळात अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या मुद्यावरून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका टिपणी करताना दिसत आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकानंतर मुख्यमंत्रीपद कोणाकडे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.