हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असून स्थानिक नागरिकांनी मात्र याला जोरदार विरोध केला आहे. आज तर ज्याठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे तिथे घुसण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये चांगलीच झटापट पहायला मिळाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच यावेळी अश्रु धुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्या. या संपूर्ण घडामोडीने वातावरण चांगलंच तापलं आहे.
बारसू येथील रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध करत आंदोलकांनी बॅरेगेटींग तोडून सर्वेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न केला. आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर सुरु केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसानी आंदोलकांवर लाठीचार्ज केला तसेच अश्रु धुराचा वापर करण्यात आला.
या संपूर्ण घटनेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत म्हंटल की, हे स्थानिकांचे आंदोलन नाही. बाहेरची माणसं आणून ही परिस्थिती चिघळवण्यात आली आहे. पक्षीय राजकारणाला स्थानिकांचे रुप देऊन काही लोकांनी हे आंदोलन केले आहे असा आरोप उदय सामंत यांनी केला. यामागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे. तुमच्या मताच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांची डोकी भडकवू नका असे म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.