नवी दिल्ली । ICC 2024 ते 2031 दरम्यान 8 मोठ्या स्पर्धांचे आयोजन करणार आहे. यातील 3 ICC स्पर्धांची जबाबदारी भारताकडे देण्यात आली आहे. भारतात 2026 टी-20 विश्वचषक, 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. या तीन मोठ्या स्पर्धांसाठी BCCI ला ICC कडून मोठा दिलासा मिळाला आहे. ICC ने प्रत्येक स्पर्धेसाठी भारत सरकारला 10 टक्के टॅक्स देण्याचे मान्य केले. ICC च्या या निर्णयामुळे BCCI चे 1500 कोटी ($ 200 मिलियन) वाचणार आहेत.
BCCI आधीच 2016 T20 विश्वचषक आणि 2023 एकदिवसीय विश्वचषक आयोजित करण्यासाठी 750 कोटी रुपयांचे नुकसान सहन करण्यास तयार आहे. 2021 चा टी-20 विश्वचषक भारताबाहेर UAE ला हलवला नसता तर हा तोटा जास्त असू शकला असता. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, BCCI वगळता इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांना त्यांच्या संबंधित सरकारांकडून कर सवलतीचा लाभ मिळतो. करात सूट न मिळाल्याने BCCI चे मोठे नुकसान होते आहे.
BCCI च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “इतर प्रत्येक क्रिकेट बोर्डाला त्यांच्या सरकारकडून करात सूट मिळते. मात्र केंद्र सरकार आपल्यासाठीचे कायदे बदलेल अशी अपेक्षा BCCI करू शकत नाही. त्यामुळे ICC ला फटका बसावा, असे सर्व सदस्यांना वाटत होते. असो, BCCI भारतात कार्यक्रम आयोजित करून सर्वाधिक कमाई करते. भारतीय बोर्डाला ICC च्या महसूल पूलमधून कोणत्याही कपातीचा सामना करावा लागणार नाही.
BCCI IPL च्या कमाईवर टॅक्स भरणार नाही
BCCI ला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटविरुद्ध मोठा विजय मिळाला आहे. आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने (ITAT) BCCI चा हा युक्तिवाद कायम ठेवला आहे की, IPL द्वारे पैसे कमावले जात असले तरी त्याचा उद्देश क्रिकेटला प्रोत्साहन देणे आहे. त्यामुळे या स्पर्धेतून मिळणारे उत्पन्न इन्कम टॅक्स सवलतीच्या कक्षेत येते.
2016-17 मध्ये कर विभागाने BCCI ला नोटीस बजावली होती. या नोटिसांमध्ये BCCI ला IPL मधून मिळणाऱ्या कमाईवरील आयकर कायद्याच्या कलम 12A अंतर्गत सूट का काढण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली होती. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या या नोटिशीच्या विरोधात BCCI ने आयकर अपीलीय न्यायाधिकरणाकडे (ITAT) धाव घेतली होती.