हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यापासून मविआतील दोन पक्षांचे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडीतून कोणाला उमेदवारी दिली जाणार आणि कोणता गट बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच सुशिलकुमार शिंदे यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हा मुद्दा चर्चेत आला असताना सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे उमेदवार असणार असल्याची घोषणा केली आहे. आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहिले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर सुशीलकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत देत, लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे काँग्रेसच्या उमेदवार असतील हे स्पष्ट केले.
माध्यमांनी बोलताना सुशीलकुमार म्हणाले की, “मी हे जाहीरपणे सांगितलेलं आहे की प्रणिती ताईच काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार राहतील. मी तर आता राजकारणातून निवृत्त झाल्यासारखाच आहे. पण जी काही मदत लागेन ती मी करत राहीन हे मी तुम्हाला सांगतो” दरम्यान, सुशीलकुमार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एक नवी चर्चा सुरू झाली आहे. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत मविआकडून किंवा इंडिया आघाडीकडून पहिला उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे पाहिला मिळतील असे देखील म्हटले जात आहे.